तुमच्या आमच्या श्रद्धेचा बिझनेस

देशात सध्या देवी-दैवतांच्या नावानं मस्त बिझनेस सुरू आहे. जितकी मोठी मूर्ती तितकी जास्त गर्दी आणि दानाची रक्कमही हे फक्त गणेशोत्सव काळातच होतंय असं नाही परंतू आपल्या आपल्या गणेश मंडळांचं मार्केटिंग व्हावं, म्हणून ज्या बॉलिवूडवर देवी-दैवतांचा अपमान केल्याचा, तोकडे कपडे घालून अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला जातो, त्यांनाच दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर मंडळांच्या सोशल मीडिया पेजवरून लाईव्ह करून आम्ही किती वाजता येतोय, केव्हा येतोय, याची माहिती स्वत: बॉलिवूड अभिनेत्री देत होत्या. दर्शनासाठी गर्दी जमवण्यासाठी ही मार्केटिंगची नवी पद्धत. लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षी 5 किलोहून अधिक सोनं आणि 60 किलोहून अधिक चांदी दान करण्यात आली. याशिवाय 4 कोटींहून अधिक रक्कम दानपेटीत जमा झाली. सोन्या चांदीचे दागिने, पैसे दान करण्याची ही आतापर्यंतची पद्धत मात्र एका भाविकानं लालबागच्या राजाला चक्क बाईक गिफ्ट दिली. आता काय गणपती बाईकवर बसून फेरफटका मारणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. आता तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 200 रुपयांचा पास घेतल्यानंतरच देवीचं दर्शन घेता येणार. पैसे कमवण्यासाठी किती सुंदर प्लॅनिंग सुरू आहे बघा. कोणत्याही मोठ्या, भव्य मंदिरात गेल्यावर भाविकांसाठी एक प्रसादाचा पेढाही मिळत नाही, ना कोणती सोय केलेली असते, मग इतक्या मोठ्या प्रमाणात जी दान केलेली रक्कम असते ही फक्त मंदिराचे ट्रस्टी, पुजारी आणि इतर सदस्यांचा खिशा भरण्यासाठी असते का? नेमकं इतक्या कोट्यवधी रुपयांचं हे करतात तरी काय? मंदिरात जाणं तिथल्या भक्तिमय वातावरणात रमणं ही वेगळी गोष्ट . तिथे जाऊन तासनतास रांगा लावणं, धक्के खाणं, मोबाईल हरवणं, मुलं गमावणं अशा घटना जर घडतं असतील तर कशाला स्वत:चं नुकसान करण्यासाठी या मंडळांना आपण भीक घालतोय? घरचा देव, छोट्या मंदिरातला देव आणि मोठ्या मंदिरातला देव वेगळाय का? मुंबई, पुण्यातले भव्य गणपती असो किंवा अनेक प्रसिद्ध मंदिरं प्रत्येक ठिकाणी भाविकांना पैशांनी मोजलं जातं. जितकं जास्त दान तितकं जवळून आणि लवकर दर्शन. लालबागचा राजा, चिंतामणीच्या दर्शनाला लोकांना धक्के खावे लागतात तर बॉलिवूडचे सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी तिथे सहकुटुंब, मित्रपरिवारांसोबत सेल्फी काढण्यात तासनतास मग्न असतात.. यावेळी सर्वसामान्य महिलांना धक्काबुक्की करणारे हेच मंडळाचे कार्यकर्ते Y+ दर्जाच्या सुरक्षेपेक्षाही चोख सुरक्षा यांना पुरवतात. सण उत्सवांमुळे, मंदिरांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, छोट्यापासून मोठ्या व्यावसायांना चालना मिळते, त्या संबंधित परिसराला वैभव प्राप्त होतं. या गोष्टी जरी मान्य असल्या तरी सध्या नरेंद्र दाभोलकर जे म्हणायचे त्याच ओळी आज खऱ्या ठरताना दिसतायंत. फक्त ते पुजाऱ्याचं पोट म्हणायचे आता मंदिराच्या मंडळांच्या, संस्थानच्या कार्यकर्त्यांची पोट भरली जातायंत इतकंच. प्रश्न कोणताही असो, देवी-दैवतांचा असो किंवा इतर डोळस वृत्तीनं जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर बोलण्याचा ते मांडण्याचा खरेपणा, प्रामाणिकपणा प्रत्येकामध्ये असायला हवा. बाकी आपल्या सण-उत्सवांमध्ये वाजणारे डिजे, बॅण्जो, ढोलचे आवाज आणि मशिदच्या भोंग्यांचा आवाज यात नेमक्या कोणत्या आवाजाचा त्रास अधिक हे समजण्याइतकी आपली बुद्धी या राजकीय पक्षांनी भ्रष्ट करण्यात यश मिळवलंय इतकं मात्र खरं.. पूजा उजगरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साडी आणि आठवणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे

टवाळखोरांना आवरा