महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे, धर्म युद्ध, व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, एक है तो सेफ है, घरबश्या मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा दिल्या गेल्या . मविआकडून गद्दार, खोके, मिंधे, धारावी पुनर्विकास प्रकल्प, अदानींच्या मुद्द्यावरून जहरी टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, शाहांपासून ते राहुल गांधींच्या सभा गाजल्या. जे विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करत होते तेच त्यांच्या जाहीरनाम्यात 3 हजार रुपये देण्याचं आश्वासन देताना दिसले. निकालानंतर जी आकडेवारी समोर आली ती स्वत: भाजपा नेत्यांनाही अपेक्षित नसेल अशीच. इतके एक्झिट पोल, ओपिनियन पोल झाले, यात आकडेवारी दर्शवली त्यात मविआ आसपासही फिरकताना दिसली नाही. महायुतीत एकट्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळाल्यात त्या महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळूनही आल्या नाहीत. लोकसभेत हिरो बनलेली काँग्रेस विधानसभेत कशी झिरो झाली हे कळायला मार्ग नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुखांचा पराभव झाला. राजेश टोपे, वैभव नाईक, बच्चू कडूही निवडणूक हरलेत. या मातब्बर नेत्यांचा पराभव करणारे खूप ग्रेट नेते होते, खूप मोठं आव्हान होतं असंही नाही. ज्यांची नावं मी गेल्या 5 वर्षात जास्त ऐकलीही नाहीत, असेच चेहरे मैदानात होते. नव्या नेत्यांना, चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, हेही तितकंच खरंय. हो मात्र कोकणात राणे बंधूंशिवाय दुसरा पर्यायच महायुतीकडे नव्हता का? नारायण राणे स्वत: केंद्रीय मंत्री, निलेश राणे माजी खासदार, भाजपा नेते असूनही त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत तिकीट मिळवलं आणि विजयी झाले. भाऊ नितेश राणेही जिंकलेत. जर एकाच राणे कुटुंबातील तिघांकडे पदं आहेत, गेली अनेक वर्ष त्यांच्या पक्षाची सत्ताही आहे, तरी कोकणाचा किती विकास यांनी केला? मुंबई-गोवा हायवेची दशा, कोकणात जाताना होणारे हाल याला कोण जबाबदार? दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांनी मुलीला तिकीट मिळवून दिलं. श्रीजया चव्हाणांनी असा कोणता राजकारणात ठसा उमटवला होता की तिकीटही मिळालं आणि विजयीही झाल्या. महायुतीनं नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध करूनही अजित पवारांनी नाकावर टिचून उमेदवारी तर दिलीच याशिवाय त्यांची मुलगी सना मलिकांनाही तिकीट दिलं. तेव्हा भाजपा नेत्यांचं हिंदुत्व कुठे होतं? महायुतीत भाजपानं सर्वाधिक जागा लढवल्या. सोबत असूनही केवळ उमेदवारीसाठी नेते शिंदे गटात किंवा अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवताना दिसले, नेमकं कोणत्या विचारधारेवर हे बोलतात? जाती धर्माचं राजकारण, मशिदीवरचे भोंगे, मराठा-ओबीसी वाद, त्यात जरांगे-हाकेंचे पार पलटवार, बारामतीत काका-पुतण्या संघर्षही गाजला. बारामतीत पवारांशिवाय दुसरं कुणीच पर्याय दोन्ही राष्ट्रवादीकडे नव्हता का? असो महायुतीचा विजय हा पैशांचा विजय असल्याचा आरोप होतोय, तसं पाहायला गेलं तर पैसेच सर्वच पक्षांनी वाटलेत, त्यामुळे सरकार कोणत्याही पक्षांचं असो जनतेत्या हिताचे निर्णय घेतील इतकीच माफक अपेक्षा. महायुतीनं त्यातल्या त्यात भाजपानं केलेलं मायक्रो प्लॅनिंग, पक्षादेशाचं पालन करणारे नेते, कार्यकर्ते यामुळे भाजपाला महाविजय मिळवता आलाय.
#maharashtra #MaharashtraAssemblyElections2024 #MaharashtraPolitics #AssemblyResult #mahahuti #MVA #maharashtracongress #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BJP4Maharashtra
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा