पळून लग्न करताय.. या गोष्टींचा एकदातरी विचार कराच...
याने/हिने पळून लग्न केलं. याची/हिची मुलगी पळून गेली, असं आपण सहज बोलतो आणि नावं ठेऊन मोकळं देखील होतो. मात्र हे सगळं ऐकून समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय, याचा विचार केलाय कधी? अशीच वेळ कधी तुमच्यावर आली आणि तुम्हाला कोणी असं बोलून गेलं तर मी तर बऱ्याचदा असं बोलतानाही लोकांना ऐकलंय, की ज्या भावाची बहीण पळून लग्न करते किंवा दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करते, तेव्हा तिच्या भावानं बांगड्या घालाव्यात, यांना इज्जत आहे का? चारचौघात उभं राहण्याची लायकी आहे का? हे तर एका बहिणीलापण सांभाळू शकले नाहीत. माझ्या बहिणीने असं केलं असतं तर मारून टाकलं असतं, असं भडकवणारे खूप आहेत. खरं तर अशा लोकांचे खायचेदेखील वांदे असतात आणि हे इज्जत काय असते याचे दाखले देतात. लग्नाच्या भर मंडपातही त्यांचा अपमान करतात. बावळट प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. याच सगळ्या गोष्टींमुळे समाजाच्या प्रतिष्ठेपायी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये जसं भावानं आणि आईनं मिळून पळून लग्न करणाऱ्या मुलीचं शीर धडावेगळं केलं होतं आणि त्याचा सेल्फी पोस्ट केला होता, अशा घटना घडतात. बीडमधलं सुमीत वाघमारे हत्याकांडही याचं आणखी एक उदाहरण. त्यामुळे हे कुठेतरी आता थांबायला हवं असं वाटतंय.
आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं का लिहितेय? गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलानं पळून लग्न केलं. त्यानिमित्तानं आम्ही काय अनुभव घेतलेत, ते मांडतेय. तुमच्या एका हट्टामुळे किंवा खूपच अति खऱ्या प्रेमामुळे आपल्या कुटुंबाला कोणाच्यातरी शिव्या खाव्या लागतात, दहशतीत जगावं लागतं, हे सगळं करून तुम्ही आनंदात असता का? भावाला, बापाला जाऊ द्या, परंतू एक माथेफिरू येऊन तुमच्या आईला सर्वांसमोर अश्लील शिवीगाळ करत असेल, पोलीस नेहमीप्रमाणे अतिसौम्य शिवराळ भाषेत अरेकारे करून प्रश्न विचारत असतील तर हे तुम्हाला तरी पटतंय का? उद्या तुमच्या प्रेमाला सक्सेस मिळेलही, परंतू या सगळ्यात एखाद्याचा जीव गेला तर तो परत येईल का? जीवनात अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवता येतात, मात्र तुमच्यामुळे कुटुंबातील एकाचा जीव गेला तर तो पुन्हा मिळवता येईल का? प्रेम वगैरे राहु द्या हो, आधी तुम्ही स्वत:वर, विचारांवर काम करा, मग पाऊलं उचला. काही प्रकरणात परिस्थिती थोड्या रूसव्या फुगव्यांनी नीट होतेही परंतू बऱ्याचदा या गोष्टी जीवावर उठतात तुमच्या आणि कुटुंबाच्याही. तुमच्या प्रेमामुळे मुलाचा किंवा मुलीच्या कुटुंबातल्या एखाद्याचा जीव गेला तर तेव्हा त्या प्रेमाला चाटत बसणार आहात का? म्हणून कोणतंही पाऊल टाकताना 10 वेळा नाहीतर 1000 वेळा विचार करा. कारण movie आणि खऱ्या आयुष्यात बराच फरक असतो.
आता आई-वडिलांनीही समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. अशा घटना या फक्त मुलाच्या किंवा मुलीच्या चुकीने नाही तर दोघांच्या मर्जीने होतात, याचा राग बाजूला ठेऊन सारासार विवेकबुद्धीनं विचार करायला हवा. आपल्या मुलाचा/मुलीचा आनंद कशात आहे, तीनं जी व्यक्ती जीवनसाथी म्हणून निवडली ती कोणत्या जातीधर्माची आहे यापेक्षा ती व्यक्ती म्हणून कशी आहे? ती आपल्या मुला/मुलीला आयुष्यभर आधार देऊ शकेल का? याकडे बघून विरोध किंवा पाठिंबा द्यावा, या प्रस्तापित समाजापेक्षा, त्यांच्या टोमण्यापेक्षा माझ्या मुलाचा/मुलीचा आनंद, तिचं सुख, तीचं जगणं, असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, हे ठरवण्याला प्राधान्य द्या. जे नातेवाईक नुसत्या दुसऱ्यांच्या कुरापती काढत बसतात, त्यापेक्षा जन्म दिलेल्या मुला/मुलीचा विचार करा.
परंतू पळून लग्न करणाऱ्या मुला/मुलींनीही आपण कोणासोबत लग्न करतोय, इतका विरोध फक्त एका व्यक्तीसाठी का करतोय?, याचा विचार करा. आई-वडिल आणि तुम्ही देखील हट्ट धरून बसलात तर याचा त्रास दोघांनाही होईल. त्यामुळे नीट दोन्ही बाजूने विचार करा. आपलं वय काय, आपण करतोय काय, हे बघा. बाकी मनस्ताप दोघांना हे निश्चित. आईवडिलांपेक्षा कोणी कितीही असलं तरी त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम कुणीच देऊ शकत नाही हेही तितकच खरं. बाकी समाजाचं आणि मुलामुलींचं प्रबोधन होणं गरजेचं.
पूजा उजगरे
good
उत्तर द्याहटवा